पुणे : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार यांचं अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. विठ्ठल सखाराम पोळेकर (वय ७०, रा. पोळेकर वाडी, सिंहगड पायथा) असं हत्या करण्यात आलेल्या शासकीय ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी जबलपूरहून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी पहाटे सहा वाजता मॉर्नींग वॉकसाठी गेलेले विठ्ठल पोळेकर यांचं अपहरण करण्यात आलं होतं. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या भागातील कुख्यात गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याचे पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानंतर आज (दि. १६) विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे तूकडे खडकवासला धरणाच्या पाण्यात ओसाडे गावच्या हद्दीत आढळून आले आहेत. या घटनेनं पुणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
बाबू मामे याने काही दिवसांपुर्वी विठ्ठल पोळेकर यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन जग्वार कार किंवा २ कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली होती. त्यामुळं गुंड बाबू मामे याने अपहरण केल्याची तक्रार पोळेकर यांच्या कुटुंबीयांनी पोलीसांकडे दिली होती. त्यानुसार या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.