पुणे : ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ याचा आपल्याला अभिमान आहेच. यासह आता पुण्याला हसरे, निरोगी व आनंदी ठेवण्याची गरज असून, त्यासाठी हास्ययोग महत्वाचा आहे. पुणेकरांमध्ये हास्ययोगातून नवचैतन्य फुलवण्याचे काम हास्ययोग चळवळ गेली तीन दशके करत आहे, अशा भावना मान्यवरांनी जागतिक हास्य दिनी व्यक्त केल्या.
जागतिक हास्य दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हास्य प्रात्यक्षिके, शरीर व मनाचे आरोग्य आणि ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटातील कलाकारांशी संवाद असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व शेवटी हास्ययोगाच्या विविध प्रकारातून विठ्ठल काटे व सुमन काटे आणि मकरंद टिल्लू यांनी प्रात्यक्षिके घेतली.
यावेळी लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे, संवाद पुणेचे सुनील महाजन, अग्रवाल आय हॉस्पिटलचे डॉ. निखिल ऋषीकेशी, गंगोत्री होम्सचे मकरंद केळकर, प्रसिद्ध व्यावसायिक प्रकाश धोका, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, उद्योजक प्रसन्न पाटील, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे व सुमन काटे, समन्वयक मकरंद टिल्लू, सचिव पोपटलाल शिंगवी, उपाध्यक्ष विजय भोसले व सहकारी आदी उपस्थित होते.
विठ्ठल काटे म्हणाले, “शरीर व मनाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी हास्य योग अतिशय उपयुक्त आहे. हास्य योगाने प्रत्येकाच्या जीवनात नवचैतन्य फुलावे. गेल्या २७ वर्षांपासून हास्ययोग चळवळीतून आम्ही लोकांच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम करत आहोत. व्याख्याने, उपक्रम यातून चळवळ अधिक व्यापक होत असल्याचा आनंद आहे. “मकरंद टिल्लू म्हणाले, “एक लाख लोक या चळवळीला जोडण्याचे लक्ष्य आहे. गृहनिर्माण संस्था, विविध भाग, समूहात चळवळ पोहोचवायची आहे. लोकांना तणावमुक्त आणि आनंदी करण्याचे सर्वात मोलाचे काम आहे. रक्ताच्या नात्यासह हास्याची नाती जोडली जाताहेत, ही आनंदाची बाब आहे.
“डॉ. निखिल ऋषिकेशी म्हणाले, “या चळवळीने लोकांना तरुण केले आहे. हसण्याने डोळ्यांचे स्नायू सक्षम होतात. डोळ्यांतील कोरडेपणा जातो. रक्तदाब, मधुमेह यामुळे डोळ्यांचे बळावणारे आजार या व्यायामाने नियंत्रणात येतात. शारीरिक व मानसिक व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी हास्य योग उपयुक्त आहे.”मकरंद केळकर म्हणाले, “आमच्या प्रकल्पात पर्यावरण पूरक विकासाला अधिक प्राधान्य दिले आहे. अनुभवातून जाणवलेल्या त्रुटी दूर करून आरोग्याला पोषक घरांची निर्मिती केली जात आहे. हास्ययोग सुरु करता येतील, अशा जागा उपलब्ध करून आनंदी विचार देणाऱ्या हास्य क्लबला प्रोत्साहन देत आहोत.”
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “जागतिक हास्य दिन साजरा कसा करावा, याचा आदर्श पुणेकरांनी घातला आहे. हास्य जगण्याचे टॉनिक आहे. कोरोना काळात हास्ययोगाचा झालेला फायदा अनुभवला आहे. स्वच्छ, हरित व सुंदर पुण्याला हसरे पुणे बनविण्यात आपण पुढाकार घेतला आहे. आनंदी व सुदृढ पुणे होण्यास ही चळवळ लाभदायक आहे.
दरम्यान, यावेळी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली. पोपटलाल सिंघवी यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. विजय भोसले यांनी आभार मानले.
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ टीमशी संवाद
हास्य दिनाच्या या कार्यक्रमात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या टीमशी संवाद साधला. मकरंद टिल्लू यांनी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक योगेश देशपांडे, अभिनेत्री अपूर्वा मोडक व कलाकारांची मुलाखत घेतली. चित्रपट निर्मितीचा प्रवास देशपांडे व मोडक यांनी उलगडला. हास्य ही वैश्विक भाषा असून, आनंदी जीवनासाठी आपण तिचा अंगीकार केला पाहिजे. आजच्या या कार्यक्रमाने मला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा व नवचैतन्य मिळाल्याची भावना देशपांडे यांनी व्यक्त केली.