लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून वारंवार लहान मोठे अपघात होत आहेत. या अपघातात अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे तर काही जणांना आपले अवयव गमावून कायमस्वरूपी अपंगत्व आलेले आहेत. त्यातच आता रेल्वे उड्डाणपुलावरील कठडा वाचविताना झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.2) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
त्यामुळे अजून किती निष्पापांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? असा सवाल नागरिकांनी केला आहे. तसेच आत्ता तरी विद्यमान खासदारसाहेब, आमदारसाहेब लक्ष द्या.अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. थेऊर फाटा येथील अपघातात रामेश्वर किशोर राठोड (वय-23) व श्याम गजमल जाधव (वय 29, दोघेही सध्या रा. टिळक नगर कात्रज, पुणे, मूळ रा. जामठी गाव, ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये दोघांचा जागेवरच चेंदामेंदा झाल्याने मृत्यू झाला होता. या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनावर तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर राठोड व श्याम जाधव हे दोघेजण दुचाकीवरून थेऊर गावाकडून थेऊर फट्याकडे चालले होते. दुचाकीवरून जात असताना, त्यांची गाडी थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाणपुरावर आली असता अचानक समोर गतिरोधक दिसला. गतिरोधकाला धडकून दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडले. तेव्हा थेऊर फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्या दोघांनाही चिरडले. आणि अज्ञान वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलीस हवालदार विजय जाधव, पोलीस अंमलदार सागर कदम, ईश्वर भगत, प्रशांत सुतार व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोन्हीही जखमींना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी दोघांचेही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत. पुणे-सोलापुर महामार्गावरून नगर रस्त्याला अथवा पुण्याच्या बाहेरून जायचे असेल तर अनेक वाहनचालक थेऊर फाट्यावरून जातात. कारण वेळ आणि अंतरही वाचले जाते.
मात्र थेऊर फाट्याकडून थेऊरच्या दिशेकडे अथवा नगर रस्त्यावरून पुणे सोलापूर महामार्गाकडे जात असताना, चालकांना रेल्वेच्या उड्डाणपुलावरून जावे लागते. या उड्डाणपूलावर दोन्ही बाजूकडे असलेले कठडे हे चालकांसाठी धोकादायक बनले आहेत. गाडी चालविताना हे कठडे अचानक रस्त्यातच येत असल्याने वारंवार अपघात होत आहे. विशेषतः दुचाकी चालकांना समोरून येणाऱ्या मोठ्या वाहनांची लाईट चमकल्याने कठडे दिसत नाही, त्यामुळे बहुतांशी अपघात होत आहेत. त्यामुळे थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपूलावरील कठडा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार ज्ञानेश्वर कटकेसाहेब आत्ता तरी लक्ष द्या…!
थेऊर फाटा येथील वाहतूक कोंडी तर रेल्वे उड्डाणपूलावरील छोटे-मोठे अपघात होणे, ही बाब नित्याचीच ठरलेली आहे. उड्डाणपूलावरील कठड्यांमुळे दरवर्षी 4 ते 5 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यातच गुरुवारी (ता.2 जानेवारी) झालेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उड्डाणपुलावरील अपघात टाळायचे असतील तर कठडे काढून टाकावे लागतील. मात्र खासदार, आमदार व सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते चमकोगिरी करण्यात दंग असल्याने, या उड्डाणपुलावर अनेकांचे जीव जात आहेत. यामुळे “खासदार ” ”आमदार” साहेब आत्ता तरी या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लोकप्रतिनीधी या नात्याने लक्ष द्या एवढीच नागरीकांची आपल्याकडे हात जोडुन विनंती आहे.
थेऊरफाटा रेल्वे उड्डाणपूलावरील कठडे हटविण्याची मागणी नागरिक अनेक वर्षापासून करीत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने अनेकदा स्वयंसेवी संस्था व कुंजीरवाडी ग्रामपंचायतीने सामाजिक बांधिलकीतून अपघातग्रस्त कठड्याला रेडीअम व छोटे छोटे रेडिअमचे पोल कठड्यावर लावले आहेत. यामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना ते दिसत होते. मात्र काही महिन्यानतंरच ते गायब झाल्याने दुचाकीस्वारांचा प्रवास उड्डाणपूलावरुन सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात आहे. त्यामुळे अपघात व नागरिकांचे बळी वाचवायचे असतील तर उड्डाणपुलावरील कठडे हटविले पाहिजेत.
सचिन तुपे (माजी सरपंच – कुंजीरवाडी)
थेऊर उड्डाणपुलावरील अपघाताची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण व पीडब्लूडीचे (विशेष रस्ते) आर वाय पाटील यांच्याशी संपर्क साधून दूरध्वनीवरून माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी तत्काळ या घटनेची दाखल घेऊन एक टीम तयार केली आहे. ही टीम लवकरच घटनास्थळी जावून भेट देणार आहे. लवकरच घटनास्थळाचा सेफ्टी ऑडीट करून अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करण्यात येतील. असे सांगितले आहे.
पै. युवराज काकडे (सदस्य- थेऊर)