लोणीकंद (पुणे) : शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने दोघांनी विश्वास संपादन करुन वाघोली (ता. हवेली) येथील एका ३७ वर्षीय व्यक्तीची तब्बल २२ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हि घटना १२ मार्च ते १६ एप्रिल २०२४ या दरम्यान घडली.
याप्रकरणी वाघोली (Wagholi) येथील एका ३७ वर्षीय व्यक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी व्हॉटसअॅप ग्रुपचा अँडमिन व एक बँकखाते धारक यांच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी १२ मार्च ते १६ एप्रिल २०२४ दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घरी व्हॉटसअॅप ग्रुप आणि व सदर ग्रुपचे अँडमिन व मार्गदर्शक म्हणून काम पाहणारे मोबाईल धारक व्यक्तींनी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून रक्कम ट्रान्सफर करायला लावली. तसेच त्यांनी दिलेल्या मोबाईल अॅपमध्ये जावुन त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेअर ट्रेडिंग करायला लावले. तसेच सदर लिंकमध्ये केलेल्या ट्रेडिंगमध्ये नफा झाले आहे असे भासवुन फिर्यादीचा विश्वास संपादन करुन आरोपींनी वेळोवेळी तब्बल २१ लाख ९२ हजार ९२० रुपयांची फसवणूक केली.
दरम्यान, याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सीमा ढाकणे करीत आहेत.