पुणे : पोलिस चौकीत गोंधळ घालून पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शनिवार पेठ पोलिस चौकीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी अथर्व रामचंद्र जोशी (वय २२, रा. विश्वकमल कॉम्प्लेक्स, नारायण पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई प्रसाद ठाकूर यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या मध्यरात्री एकच्या सुमारास दुचाकीस्वार अथर्व भरधाव वेगात निघाला होता. त्यावेळी त्याने एका दुचाकीस्वार महिलेला धडक दिली. अपघातात महिलेच्या दुचाकीचे नुकसान झाले. त्यानंतर महिलेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. बंदोबस्तावरील पोलिसांनी अथर्वला ताब्यात घेतले. त्याला शनिवार पेठ पोलिस चौकीत नेले. तेव्हा त्याने पोलिस चौकीत गोंधळ सुरुवात केली.
घालण्यास पोलिस चौकीत त्याने तक्रारदार महिलेसह पोलिसांना शिवीगाळ केली. पोलिस शिपाई ठाकूर आणि इनामदार यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अथर्वविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर तपास करत आहेत.