शिरूर : पुणे-अहिल्यानगर क्रमांक 753(F) या राष्ट्रीय महामार्गावर शिरूर ते सरदवाडी दरम्यान सिमेंट काँक्रीटचे डिव्हायडर अज्ञात व्यक्तींनी तोडून अनधिकृतपणे रस्ता ओलांडण्यासाठी मार्ग तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून,सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार,शिरूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल शेखर शिवाजी झाडबुके यांनी याबाबत तक्रार दिली आहे. शनिवारी(ता.22)पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753(F) वरील शिरूर ते सरदवाडी या सुमारे 12 किलोमीटरच्या मार्गाची पाहणी केली असता,ठिकठिकाणी डिव्हायडर तोडल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांच्या पाहणीत सी.टी.बोरा कॉलेज ते बाबुरावनगरकडे जाणाऱ्या अंडरपासजवळ,कोळपे हॉस्पिटलसमोर,गंगा कार डेकोरसमोर,संग्राम हॉटेलसमोर, गणेश मंदिरासमोरील बोऱ्हाडेमळा परिसरात,घावटे मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील महिंद्र शोरूमसमोर तसेच हिंदुस्थान पेट्रोल पंप परिसरात महामार्गाच्या मध्यभागी असलेले आरसीसी काँक्रीटचे डिव्हायडर तोडण्यात आल्याचे आढळून आले.

महामार्गाच्या मध्यभागी असलेले डिव्हायडर तोडून ठिकठिकाणी तयार केलेल्या अनधिकृत मार्गामुळे विरुद्ध दिशेने जाणारी वाहने अचानक रस्त्यावर प्रवेश करतात त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात होत असून,यापूर्वी अनेक वाहनचालक व परिसरातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.तसेच डिव्हायडर तोडल्यामुळे भविष्यात नागरिक व वाहन चालकांच्या जीवितास पुन्हा धोका निर्माण होण्याची शक्यता असून,अपघाताचा मोठा धोका वाढला आहे. त्याचप्रमाणे डिव्हायडर तोडल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
डिव्हायडर तोडल्या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यातील कलमांच्या अंतर्गत तसेच राष्ट्रीय महामार्गासंदर्भातील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमागे नेमके कोण आहे, डिव्हायडर कोणत्या कालावधीत आणि कोणत्या कारणासाठी तोडण्यात आले.तसेच या अनधिकृत मार्गांचा वापर कोण करत होते.याचा तपास शिरूर पोलीस करीत आहेत.त्यामुळे दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सहा दिवसांपासून आंदोलन…..
शिरूर शहर परिसरातून जाणाऱ्या पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील तोडण्यात आलेले डिव्हाइडर पुन्हा बंद करण्यात यावेत.तसेच नागरिक व वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात.या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी मागील सहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे.
महामार्गावरील अनधिकृतपणे तोडण्यात आलेल्या डिव्हाइडरमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून,अपघाताची शक्यता वाढल्याचा आरोप वाळुंज यांनी केला आहे.रस्ते विकास महामंडळाने याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठिकाणचे डिव्हाइडर तातडीने पूर्ववत करावेत आणि वाहनचालक व नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.अशी मागणी वाळुंज यांनी केली आहे.







