पुणे : मगरपट्टा परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोन दरोडेखोरांना हडपसर पोलिसांनी पकडले आहे, तर अन्य सहा जण अंधाराचा फायदा घेत पळून गेले आहेत. या प्रकरणी 8 जणांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 30 जून रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास मगरपट्टा चौकातील लोहीयानगर झोपडपट्टीमध्ये करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत दिगंबर दुधाळ (वय-35) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ऋतिक महिन्द्र रणखांबे (वय-24), पियुष पोपट लोंढे (वय-20 दोघे रा. लोहियानगर, झोपडपट्टी, हडपसर) अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. तर प्रेम बापू चंदनवाले (वय-19), रुपेश अशोक गोहीरे (वय-19), निशांत महादेव कांबळे (वय-18 तिघे रा. लोहियानगर, झोपडपट्टी, हडपसर), चेतन सोमनाथ शिरोळे (वय-29 रा. तरवडे वस्ती, वानवडी) यांच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहीयानगर झोपडपट्टीमधील सार्वजनिक शौचालयाच्या वरिल खोलीत काही तरुण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला.
पोलीस आल्याची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत सहाजण पळून गेले, तर दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्याले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता मगरपट्टा चौक परिसरातुन रात्री जाणाऱ्या लोकांचे मोबाईल फोन व रोकड चोरण्याच्या तसेच गांधी चौक परिसरातील दागिन्यांच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.