पुणे : पुण्यात मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शहरातील काशेवाडी येथील घरात शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. राजा परदेशी (वय-४४, रा. महाराष्ट्र तरुण मंडळा शेजारी, हरकानगर, काशेवाडी, भवानी पेठ) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांची पत्नी कंचन राजा परदेशी (वय-३८, रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी लक्कडसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा परदेशी यांचे ताडीवाला रोड येथे गोदाम होते. लक्कडसिंग हा त्यांना डुक्कर पुरविण्याचे काम करायचा. परदेशी हे या डुक्करांचे मांस तयार करुन ताडीवाला रोड येथील गोदामात ठेवत असायचा. ग्राहकांच्या मागणी नुसार त्यांना पुरवठा करत असे. पावसाळ्यात त्यांच्या गोदामात पुराचे पाणी शिरले आणि सर्व माल खराब झाला. त्यामुळे त्यांचे जवळपास १० लाख रुपयांचे नुकसान झाले होते.
हे नुकसान परदेशी भरुन काढू शकले नाहीत. दुसरीकडे लक्कडसिंग हा त्यांच्याकडे ‘तुझे नुकसान झाले त्याला मी काय करु, माझे पैसे दे’, असं म्हणून पैशांची वारंवार मागणी करत होता. एवढंच नाही तर तो शिवीगाळ करुन मानसिक त्रास देखील देत होता. तसेच मुलांना उचलून नेण्याची धमकी देत होता. त्याच्या या मानसिक त्रासाला कंटाळून राजा परदेशी यांनी शनिवारी दुपारी घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे करत आहेत.