लोणी काळभोर : कोणताही वैध दाखल नसताना भारतात घुसखोरी करून मागील काही दशकापासून राहणाऱ्या एका 50 वर्षीय संशयित बांगलादेशी बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाने थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. 24) केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हा मूळ परदेशी नागरिक असून त्याचा जन्म बांगलादेश मध्ये झाला आहे. आरोपीने कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय तसेच भारत बांगलादेश सिमेवरील अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला. आरोपीने सर्वात प्रथम कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे प्रवेश केला. त्यानंतर देशातील विविध ठिकाणे फिरून तो थेऊर येथे अवैधरीत्या वास्तव्य करत होता. त्याने थेऊर परिसरात दवाखानाही थाटला होता.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, दहशतवाद विरोधी पथकाने थेऊर येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीने भारताचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान कार्ड अशी बनावट तयार केलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात परकीय नागरीक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.