नागपुर : नागपुरात एक भयानक घटना घडली असून फुग्यांच्या सिलिंडरच्या स्फोटात चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिशप कॉटन स्कूल समोर असलेल्या मैदानात रविवारी रात्री फुग्यांच्या सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
सिझान आसिफ शेख (वय ४, रा. मानकापूर) असे सिलिंडर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर फरिया हबीब शेख (वय २८) आणि अनमता हबीब शेख (वय २४) असे जखमी महिलांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर फुगेविक्रेता फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानावर सतत नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे याठिकाणी फुगे विक्रेते येत असतात. क्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने सिझान रविवारी रात्री आपल्या मावशीसोबत मैदानावर फिरण्यासाठी आला होता. फारिया आणि अनमता सिझानच्या मावशी आहेत. दरम्यान मैदानावर रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे घेऊन विकत बसला होता.
या फुगेवाल्याला बघताच सिझानने फुगा खरेदीचा मावशीकडे हट्ट धरला. फुगेवाल्याच्या बाजूला तिघेही उभे असताना अचानक सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता, की सिलिंडर उंच हवेत उडाला. आग लागल्याने सिझान गंभीर जखमी झाला. तसेच फरिया आणि अनमता यांनाही सिलिडर लागल्यामुळे दुखापत झाली होती.
तातडीने परिसरातील नागरिकांनी तिघांनाही रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी सिझानला मृत घोषित केलं. फारिया आणि अनमता यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या फुगेवाला फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.