पुणे : पूर्व वैमनस्यातून गुंडांनी एका १७ वर्षीय मुलावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना ६ नोव्हेबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी जय मुकुंद जगताप (वय- १७, रा. सिया इंटरप्रायझेस, धबाडी, वडगाव) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पर्वती पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवनाथ गाडे, अजिंक्य चौधरी, अर्षद, पद्या (सर्व रा. जनता वसाहत, पर्वती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अजिंक्य चौधरी याच्यावर मारामारी, बेकायदा जमाव जमवून मारहाण करणे, चॅप्टर केस असे गुन्हे दाखल आहे. तसेच नवनाथ गाडे याच्यावर मारामारी, धमकावणेचा गुन्हा दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जय हा चार महिन्यांपूर्वी जनता वसाहत येथे राहायला होता. सध्या तो वडगाव येथे राहायला असून, तो बारावीत शिकत आहे. एक महिन्यांपूर्वी त्याचे नवनाथ गाडे याच्यासोबत भांडणे झाली होती. बुधवारी रात्री तो मित्रांना भेटुन दुचाकीवरुन घरी जात होता. त्यावेळी वाटेत
आरोपी नवनाथ याने त्याची गाडी अडविली.
दरम्यान, आरोपी नवनाथ याने शिवीगाळ करायला सुरुवात केली़. तेव्हा अजिंक्य चौधरी, अर्षद व पद्या तेथे आला. नवनाथ आणि अजिंक्य यांनी कोयते काढून फिर्यादी यांच्यावर वार करायला सुरुवात केली. जय हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी अर्षद व पद्या याने त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नवनाथ व अजिंक्य यांनी जयच्या डोक्यात,मानेवर, कंबरेवर,हातावर वार करुन गंभीर जखमी केले आहे.
मात्र, जय याचा आवाज ऐकून तेथील नागरिक जमा झाल्यावर घटनास्थळावरून आरोपी पळून गेले. त्यानंतर जयच्या ओळखीच्या मित्रांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले आहे. ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धावटे करीत आहेत.