सोलापूर : केगाव (शिवाजीनगर) ते हत्तूर या ९०० कोटींच्या विजयपूर बायपासचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तीन महिन्यांपूर्वी त्याचे लोकार्पणही केले होते. परंतु, या बायपासवर मोठमोठे खड्डे आणि भेगा पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सोलापूर शहरातून जाणारी जड वाहतूक बंद व्हावी. वाहनांची समस्या सुटावी. तसेच वाहतुकीमुळे होणारे अपघात कमी व्हावेत. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील केगावजवळून बायपास करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. आणि त्यानुसार केगाव (शिवाजीनगर) ते हत्तूर असा ९०० कोटी रुपयांचा २२ किलोमीटरपर्यंत विजयपूर बायपास तयार केला गेला.
केगाव ते हत्तूर या रस्त्याचे काम नोव्हेंबर २०१८ सुरू झाले. आणि ते काम मार्च २०२२ मध्ये पूर्ण झाले. आणि या रस्त्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखातदेखील पार पडला. मात्र, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे वाहनधारक त्या बायपासवरून प्रवास करायला घाबरत असल्याची स्थिती आहे. सोलापूर शहरातून बायपासला जाताना व बायपासवरून शहराकडे येणारा रस्ता अक्षरश: उखडला आहे. पाच वर्षांत पूर्ण झालेल्या बायपासवर अडीच महिन्यांतच खड्डे पडले आहेत. यामुळे आता या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह नागरिकांनी केला झाला आहे.