पुणे : पुण्यात अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेईना. अशातच आता भरघाव बिल्टवेस् इंटरप्राईजेस कंपनीच्या डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना वाघोलीतील केसनंद फाट्यावर रात्री 12.30 वाजता घडली आहे.
वैभवी रितेश पवार (वय-1), वैभव रितेश पवार (वय-2), रीनेश नितेश पवार (वय-30) अशी मृतांची नावे आहेत. तर यात जानकी दिनेश पवार (वय 21), रिनिशा विनोद पवार (वय 18), रोशन शशादू भोसले (वय 9), नगेश निवृत्ती पवार (वय 27), दर्शन संजय वैराळ (वय 18), आलिशा विनोद पवार (वय 47) जखमी झाले आहेत.
गजानन शंकर तोट्रे (वय 26) रा. नांदेड असे डंपर चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील केसनंद फाट्यावर रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्यामुळे त्याने भरधाव डंपर फूटपाथवर चढून झोपलेल्या लोकांच्या अंगावर घातली. हे सर्व कामगार वर्ग आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
डंपर चालक गजानन तोट्रे क्रमांक (MH 12 VF 0437) याने मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर डंपर चढवला आहे. आरोपी डंपर चालक गजानन तोट्रे यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पुढील तपास वपोनी पंडित रेजितवाड करत आहेत.