शिरुर : मलठण येथे उष्माघाताने चार शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 3) घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता शेतातील साचलेले पाणी पिल्याने विषबाधा होऊन 9 शेळ्या (Goats) व 5 मेंढ्यांचा (Sheep) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरखेड (Pimperkhed) (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. 3) दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. ऐन दुष्काळात जनावरांचा मृत्यू (Death of animals) झाल्याने शेतकऱ्यांसह मेंढपाळांमध्ये तोंडचं पाणी पळालं आहे. तर या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
अंकुश सोमा कोकरे (रा. पिंपरखेड) असे नुकसान ग्रस्त मेंढपाळांचे नाव आहे. कोकरे हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे शेळ्या व मेंढ्यांना चरण्यासाठी शेतात घेऊन गेले होते. दिवसभराच्या कडक उष्णतेमुळे तहानलेल्या २० शेळ्या मेंढ्यांनी ऊसाच्या शेतातील सरीत साचलेले पाणी पिले. त्यानंतर पंधरा वीस मिनिटांत 9 शेळ्या व 5 मेंढ्यांना त्रास होऊन मृत्युमुखी पडल्या. या दुर्घटनेत मेंढपाळांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मेंढपाळ कोकरे यांनी या घटनेची तत्काळ माहिती पशुवैद्यकीय डॉ. रावसाहेब गावडे यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, पशुवैद्यकीय डॉ. रावसाहेब गावडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी इतर मेंढ्यावर उपचार केले. या शेळ्या मेंढ्यांचे मृत्यू रासायनिक खत किंवा औषधाच्या दूषित पाण्यातून विषबाधा होऊन झाला आहे. ते शवविच्छेदन केल्यानंतर समजेल. असे डॉ. गावडे यांनी सांगितले.
दरम्यान मलठण येथील शिंदेवाडीतील मेंढपाळ महेश भाऊसाहेब शिंदे यांच्या 4 शेळ्यांचा शुक्रवारी अचानक मृत्यू झाला आहे. कांद्याची पात खाल्ल्याने तसेच उष्णता वाढल्याने उष्माघाताने ही घटना घडल्याचे डॉ. प्रकाश उचाळे यांनी सांगितले आहे. दोन्हीही घटनांचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले आहे. मेंढपाळ अंकुश कोकरे मेंढपाळ महेश शिंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
जनावरांची कशी काळजी घ्यावी
उन्हाळा कडक असल्यामुळे जनावरांना आवश्यकतेनुसार पाणी पाजावे. प्रथम पाणी दूषित आहे का? याची खात्री करावी. आणि त्यानंतरच जनावरांना पाणी पाजावे. तसेच उन्हाच्या वेळी कांद्याची पात शेळ्या मेंढ्यांना चारू नये. दुपारच्या कडक उन्हात शेळ्या मेंढ्या चारण्याऐवजी सावलीला बसवावे. या प्रकारे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे.