मुंबई : राज्यात उत्साहात साजरा झालेल्या दहीहंडीला मुंबईमध्ये गालबोट लागले आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत 78 गोविंदा जखमी झाले आहेत,त्यातील ६७ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे, तर ११ जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा दहीहंडी राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे, मुंबई भागात दहीहंडीचा वेगळाच उत्साह असतो. मात्र, काही ठिकाणी या उत्साहाला गालबोट लागल्याचेही पहायला मिळाले. आज मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये तब्बल 78 गोविंदा जखमी झाले.
78 पैकी 67 गोविंदांना किरकोळ जखमा होत्या. त्यामुळे त्यांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, 11 जणांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरु आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले आहे.
मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी लाखोंचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. हे बक्षिस मिळवण्यासाठी गोविंदांकडून थरावर थर रचले जातात. थर रचताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासन तसेच आयोजकाकंतर्फे देण्यात येतात. तरीदेखील थर कोसळण्याच्या दुर्घटना थांबत नाहीत. त्यामुळे गोविंदा जखमी होण्याच्या घटना घडतात. काहींचा मृत्यूही होतो. यंदा दिलासा म्हणजे कुणाचाही मृत्यू झाला नाही.
जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गोविंदांचा 10 लाखांचा विमाही काढण्यात आला आहे. त्यामुळे जखमी गोविंदांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मोफत उपचार
मुंबईतील सर्व शासकीय व पालिका रुग्णालयांत गोविंदांवर मोफत उपचार करण्यात आले. मुंबईत दुपारी एक वाजेपर्यंत साधारण 12 गोविंदा जखमी झाले होते. दादर इथे आयोजक आणि गोविंदा पथक यांच्या निष्काळजीपणामुळे एक रुग्णवाहिका अडकली होती. रुग्णवाहिका गोविंदा पथकाचे थर लागून खाली उतरेपर्यंत एका जागी होती उभी. त्यामुळे जखमींना तातडीची मदत मिळू शकली नाही.