स्वामी चिंचोली : येथील कोविड सेंटरधील 71 बेड व इतर साहित्य चोरीला गेले आहे. तालुका आरोग्य अधिकारी आणि इतर कर्मचारी यांनी समक्ष चौकशी करून दोन महिने उलटले आहे. तरीही काहीच कारवाई केली नसल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवणाऱ्या दौंड पंचायत समितीच्या आरोग्य खात्याची बेपर्वाई समोर आली आहे.
कोरोना काळामध्ये स्वामी चिंचोली.ता दौंड येथे मल्लिकनाथ मठ या ठिकाणी कोरोना सेंटर सुरु होते. कोरोनाचे प्रभाव कमी झाल्याने आरोग्य खात्याकडून या सेंटरकडे दुर्लक्ष करण्यात आले. या सेंटरमधील पेशंटचे बेड चोरीला गेले आहे. तसेच बरेच औषधे, ऑक्सिजन सिलेंडर व त्याच्या निगडीत असलेले सर्व साहित्य धुळखात पडलेल्या अवस्थेत आज ही या सेंटर मध्ये पाहावयास मिळाले.
कोरोना काळात लागणारे साहित्य, पेशंटचे बेड याची चोरी झाल्याची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली नसल्यामुळे आजपर्यंत काय उपाययोजना केले आहे का?. तालुका आरोग्य विभागाचे याठिकाणी किती नियंत्रण आहे?, असा सवाल उपस्थित झाला आहे.
तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी माहिती विचारले असता, महिती देत नाहीत उलट टाळाटाळ करत आहेत. ही चर्चा स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने वेळीच हालचाल केली असती तर परिस्थिती गंभीर होऊ शकली नसती असे मत ग्रामस्थांमध्ये होत आहे. तसेच या सर्व परिस्थितीची चौकशी होणार आहे की नाही हा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांना पडला आहे.