पिंपरी : महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीतून नव्याने रूजू झालेल्या विविध पदावरील ६१ कर्मचाऱ्यांनी महापालिका सेवेचा राजीनामा दिला. तर, त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात आली असून आतापर्यंत ३५ उमेदवार रुजू झाले आहेत.
महापालिकेच्या वतीने रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. विविध ११ पदांच्या ३७१ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्यात सर्वाधिक २१३ जागा लिपिक पदासाठी होत्या, तर सगळ्यात कमी अॅनिमल किपर या पदासाठी एक जागा होती. यातील काही जागांमध्ये आरक्षणानुसार अर्ज आले नव्हते. त्यामुळे त्या जागा रिक्त ठेवाव्या लागल्या, तर निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने पत्रव्यवहार करून बोलावून घेतले. निवड झालेल्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले.
सद्यःस्थितीत ३७१ पैकी ३२० कर्मचारी रूजू आहेत. तर प्रतीक्षा यादीतील ३५ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना रूजू करण्यात आले. मात्र, २९ लिपिक, ४ कनिष्ठ अभियंता, २७ स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, १ समाजसेवक पदावर रुजू झालेल्या ६१ कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला होता. तो आयुक्त शेखर सिंह यांनी मंजूर केला. त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येत आहे. ३५ उमेदवार रुजू झाले आहेत.
अॅनिमल किपर पद रिक्त ठेवण्याची नामुष्की
अॅनिमल किपर या पदासाठी महापालिकेने नोकर भरतीत अर्ज मागविले होते. मात्र, ज्या संवर्गासाठी अर्ज मागविण्यात आले. त्यासाठी एकही अर्ज न आल्याने ते पद रिक्त ठेवण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे.