जुन्नर : जुन्नर तालुक्यातील येडगाव येथे उसाच्या शेताजवळून गेलेल्या वीज वाहिनीच्या तारांमध्ये घर्षण झाल्याने ठिणग्या पडून ३ शेतकऱ्यांच्या ६ एकरातील उसाच्या पिकाला आग लागल्याची घटना घडली आहे. तसेच या आगीत ठिबक सिंचन व पीव्हीसी पाइप, आंब्याची व नारळाची झाडे जळून अंदाजे १५ लाख रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी ४ च्या सुमारास घडली आहे.
या आगीत बापूसाहेब कोल्हे, राजाराम कोल्हे व सोपानराव कोल्हे या तीन शेतकऱ्यांचा प्रत्येकी २ एकर याप्रमाणे एकूण ६ एकर ऊस जळाला. स्थानिकांनी आग आटोक्यात आणल्याने संचित कोल्हे यांचा ४ एकर ऊस, राजेंद्र कोल्हे यांचे घर, गोठा व गोठ्यात असलेले शेती उपयोगी साहित्य वाचले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा आरोप करत नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत वीज महावितरण कंपनीला कळविण्यात आले असून अधिकाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, या उसाची नोंद भीमाशंकर व विघ्नहर साखर कारखान्याकडे असून, विघ्नहर कारखान्याने उसाची तोड सुरू केली आहे. तर भीमाशंकर कारखान्याने मात्र उसाची तोडणी सुरू केली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत बोलताना सहायक अभियंता सुनील डोंगरे म्हणाले कि, या घटनेचा पंचनामा केला आहे. वरिष्ठ कार्यालयाला तसा अहवाल पाठविला आहे. या शेतात असलेले विजेचे खांब लवकरच काढून टाकले जातील. दुसरीकडे बांधावर स्थलांतरित केले जातील.