पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत पुण्यात वितरण करण्यासाठी ५ लाख झेंडे मागविण्यात आले होते. त्यातील चार लाख झेंडे निकृष्ट असल्याने परत पाठविण्यात आले आहेत.
तसेच येत्या दोन ते तीन दिवसांत नव्याने झेंडे उपलब्ध होतील. अशी असा दावा पुणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
देशाला स्वातंत्र मिळालेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महापालिकेकडून १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत ५ लाख तिरंग्यांचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे. त्यासाठी ५ लाख झेंडे खरेदी केले होते.
दरम्यान, हे झेंडे निकृष्ट दर्जाजे, डाग पडलेले, अशोकचक्र मध्यभागी नसलेले आहेत, ही बाब महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शानास आली. त्यामुळे खराब झालेले झेंडे ठेकेदाराला परत पाठविण्यात आले आहेत. शासनाकडूनही मिळालेले अडीच लाख झेंडेही परत करण्यात आले आहेत. काही झेंड्यांवर रंगांचे डाग पडले असून कापड अस्वच्छ तसेच शिलाई व्यवस्थित नसल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे ठेकेदारांकडील दोन लाख तर शासनाकडील दोन लाख असे चार लाख झेंडे परत पाठविण्यात आले आहेत.