मुंबई : शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या (Education Department) खात्यातून 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची एक धक्कादायक माहिती समोर आलीय. काही आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे चार टप्यात 47 लाख 60 हजार काढल्याची माहिती समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालय येथील बँकेत असलेल्या खात्यातून हा प्रकार घडला आहे. शासनाच्या खात्यातून अशा प्रकारे लाखो रुपये चोरीला जात असल्याने अनेकांच्य भूवया उंचावल्या आहे.
यावेळी मरीनड्राइव्ह पोलिस ठाण्यात चौघांवर कलम 419, 420, 465, 467, 471, 473, 34 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून काढण्यात आलेले पैसे हे नमिता बग, प्रमोद सिंग, तप कुमार, झितन खातून यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे समोर आले आहे. हे चौघे कोण असून यामागे नेमका कुणाचा हात आहे? याबाबत पोलिस अधिक चौकशी करुन तपास करत आहे.
मंत्रालयात जी बँक आहे तिथून ही रक्कम चोरीला गेली आहे. ज्या आरोपीच्या खात्यातून ही रक्कम चोरीला गेली आहे ही सर्व खाती कोलकाता येथील आहे. महिन्याभरातील ही दुसरी घटना असून आता तरी शासन काय करणार आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
गेल्या महिन्यातच पर्यटन विभागाच्या खात्यातून 67 लाख चोरीला गेले होते. याचा तपास मरीन लाईन पोलिस करत आहे. एका महिन्यात दुसऱ्यांदा घटना घडतेय. सध्या निवडणुकीच्या धामधुमीत शासनाचे विभागाकडे लक्ष आहे की नाही असाच सवाल उपस्थित होतोय. संपूर्ण राज्याचा कारभार हाकणारी यंत्रणा सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. चोरीची बाब निदर्शनास ही येताच त्याने चोरीची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांकडे गुन्हाही दाखल केला.