पुणे : पुणे महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी दरवर्षी शहरातील वाड्यांचे सर्वेक्षण करून धोकादायक असलेले वाडे उतरवले जातात. त्यानुसार शहरातील वाड्यांचे सर्वेक्षण करून धोकादायक असलेल्या ४६ वाड्यांना पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने नोटीस बजावली आहे. शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये जुने वाडे आणि धोकादायक इमारती आहेत. त्यामुळे पालिकेकडून दरवर्षी अशा वाड्यांचे सर्वेक्षण केले जाते.
शहरातील गणेश पेठ, गंज पेठ, सोमवार पेठ, कसबा पेठ, घोरपडे पेठ, मंगळवार पेठ आणि आजूबाजूच्या परिसरातील प्रमुख पेठ भागात असलेले हे वाडे धोकादायक स्थितीत आहेत. मागील वर्षी या वाड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात हे वाडे अतिधोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले आहे.
त्यानुसार अतिधोकादायक वाडे, मध्यम धोकादायक वाडे, कमी धोकादायक वाडे असे वर्गीकरण केले जाते. संबंधित वाडे मालकांना त्याबाबतच्या सूचना केल्या जातात. धोकादायक वाडे उतरवण्यास सांगितले जाते. त्याचा खर्चही संबंधित वाडेमालकाकडून वसूल केला जातो. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात जागा मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये वाद असल्याने अशा वाड्याची दुरूस्ती जागा मालक करत नाहीत. त्यामुळे हे वाडे पावसाळ्यात कोसळण्याचा धोका असतो.
दरम्यान, पुणे महानगर पालिकेने दोन वर्षांपूर्वी सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये १४१ धोकादायक वाडे आढळून आले होते. त्यापैकी ९५ धोकादायक वाडे गेल्यावर्षी उतरविण्यात आले आहेत. तर ४६ वाडे उतरविण्यास नागरिकांकडून विरोध हाेत आहे. यामुळे वाडे मोकळे करण्यात अनेक कायदेशीर अडचणींना महापालिकेला तोंड द्यावे लागते. त्यामुळे या वाड्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, ते धोकादायक असल्याचे फलकही लावण्यात आले आहेत.