लोणी काळभोर : कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या 44 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा 400 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. अशी माहिती सरपंच सरपंच हरेश गोठे यांनी दिली आहे.
कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत कार्यालयात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन बुधवारी (ता. 25) करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच हरेश गोठे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी सरपंच सचिन तुपे, माजी उपसरपंच भरत निगडे, डाळिंब उत्पादन संघ महाराष्ट्र राज्य सचिव गोरख घुले, ग्रामपंचायत सदस्य संग्राम कोतवाल, सागर निगडे, चंद्रकांत मेमाणे, कैलास तुपे, अजय कुंजीर, लता कुदळे, सारिका भोंगळे, अलका कुंजीर, गोकुळ ताम्हाणे, उपसरपंच दिपक ताम्हाणे, ग्रामपंचायत अधिकारी सविता भुजबळ, बाप्पू घुले, काळूराम कुंजीर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मानवाच्या शरीरातील डोळे हा अत्यंत महत्त्वाचा अवयव असून त्याची व्यवस्थित निगा राखली गेली पाहिजे, या हेतूने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.आरोग्य शिबिरात नागरिकांचे मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, भिंगरोपन शस्त्रक्रिया संदर्भात तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. डोळे तपासणी करणाऱ्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. या शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कुंजीरवाडी व बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
दरम्यान, कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रथमच वर्धापनदिनाच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 400 नागरिकांना फायदा झाला आहे. त्यामुळे या समाजोपयोगी उपक्रमाचे व कुंजीरवाडीचे सरपंच हरेश गोठे व त्यांचे सहकाऱ्यांचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.