महाड : महामार्गालगत उभ्या असलेल्या स्कॉर्पिओला टोईंग व्हॅन व्हॅनने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला. गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री वीर रेल्वे स्थानकानजीक हा अपघात झाला. अपघातात मरण पावलेले तीन तरुण महाड येथील तर एक तरुण दासगाव येथील आहे.
स्कॉर्पिओमधील डिझेल संपल्याने वीर नजिक ही कार उभी करण्यात आली होती. कारमधील सूर्यकांत सखाराम मोर (२७) साहिल ऊर्फ ऋतिक नधुराम शेलार (२५) प्रसाद रघुनाथ नातेकर (२५, तिघेही रा. महाड), शुभम राजेंद्र माटल (२७ रा. शिरगाव ता. महाड), सुरज नलावडे (३४, रा. चांभारखिंड, महाड), समीर सुधीर मिंडे (३५, रा. दासगांव ता. महाड) हे कारमधून उतरून कारच्या अवतीभवती मध्यरात्री साडेबारा वाजता उभे होते. त्याचवेळेस महाडकडून लोणेरे बाजूकडे जात असलेल्या टोईंग व्हॅनने या कारला आणि तरुणांना जोरदार धडक दिली. अपघात झाल्याचे निदर्शनास येताच या सर्व तरुणांना गंभीर जखमी अवस्थेत महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सूर्यकांत सखाराम मोरे, साहिल ऊर्फ ऋतिक नधुराम शेलार, प्रसाद रघुनाथ नातेकर या तिघांना मृत जाहीर करण्यात आले.