बीड : परभणी येथील सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये मस्साजोग हत्याकांडावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तिखट टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर २४ तासांत ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा या प्रकरणात मराठा व ओबीसी या दोन समाजातील वैमनस्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी राज्यात ठिकठिकाणी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केले जात आहे. शनिवारी परभणी येथे असा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी जनतेला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एकेरी भाषेत कडाडून हल्ला चढवला होता.
बीड जिल्ह्यातील परळी येथील एका पोलीस ठाण्यात रविवारी मनोज जरांगे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज सोमवारी बीड, अंबाजोगाईनंतर धारूर येथेही त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी येथे गुन्हा दाखल करण्यासाठी धनंजय मुंडे समर्थकांना ७ तास आंदोलन करावे लागले होते.
धारूर येथे वंजारी समाजबांधवांनी सोमवारी सकाळी १० वाजेपासून पोलीस ठाण्यापुढे आंदोलन करत मनोज जरांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी दुपारी १ च्या सुमारास बाबासाहेब तिडके (रा. भोगलवाडी) यांच्या फिर्यादीवरून जरांगेंविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.