मुंबई : मुंबईतील १५४ वर्ष जुना ब्रिटिशकालीन कर्नाक पूल पाडण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेने १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान २७ तासांचा मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे ३६ मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेवरील बहुतांश लोकल गाड्यांच्या फेऱ्या दादरपर्यंत होतील. हार्बर मार्गावरील बहुतांश फेऱ्या या वडाळ्यापर्यंत चालविण्यात येणार असून १९ आणि २१ नोव्हेंबरला बहुतांश मुंबई पुणे एक्स्प्रेस गाड्यांसह इतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
मुंबई-पुणे मार्गावरील महत्वाच्या रेल्वे होणार रद्द…
मुंबई-पुणे मार्गावरील इंटरसिटी, डेक्कन, सिंहगड, प्रगती, डेक्कन क्वीन या रेल्वेगाड्या रद्द होणार आहे. दरम्यान, दादर, पनवेलहून काही एक्स्प्रेस सुटणार मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस १९ आणि २० नोव्हेंबर रोजी मुंबईऐवजी पनवेल येथून सुटतील, तर काही गाड्या दादर, तसेच पुण्यातून सोडण्यात येणार आहेत. मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस, हावडा, फिरोजपूरसह, इंद्रायणी एक्स्प्रेस, मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस यासह अन्य गाड्या दादर आणि पनवेलपर्यंतच चालवण्यात येणार आहेत.
या लोकल सेवा होणार पूर्ण बंद…
मुंबईत १९ नोव्हेंबर रोजी येणारी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, हुसैन सागर एक्सप्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस आणि गरीबरथ एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी मुंबई-नांदेड तपोवन, मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी, मुंबई-जालना जनशताब्दी, मुंबई-मनमाड विशेष गाडी, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेससह अन्य काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.