अंबरनाथ : अंबरनाथ येथील बिस्किट कंपनीमध्ये ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ३ वर्षीय चिमुकला आपल्या आईसोबत कंपनीमध्ये आला होता. त्यावेळी तो मशीनजवळ गेला असता त्याचा मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयुष चौहान असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
ही घटना ३ सप्टेंबर रोजी साडे आठ वाजण्याच्या सुमारास आनंदनगर येथील एमआयडीसीतील राधेकृष्ण बेकर्स कंपनीत घडली आहे. या प्रकरणी अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अंबरनाथ येथील एमआयडीसीत राधेकृष्ण बेकर्स नावाची बिस्कीट कंपनी आहे. बिहार राज्यातून काही दिवसांपूर्वीच कंपनीत काम करण्यासाठी पूजा चौहान ही महिला आली होती. तिचा ३ वर्षांचा मुलगा आयुष याला सांभाळण्यासाठी घरी कुणी नसल्यामुळे ती त्याला तिच्या कामावर आपल्या सोबत घेऊन जात होती. नेहमीप्रमाणे आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पूजा कंपनीत काम करत होती. बिस्कीट तयार करणाऱ्या मशीनमध्ये अडकून या मुलाचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, पूजा चौहानचा मुलगा आयुष हा बिस्कीट तयार करणाऱ्या मशीनजवळ गेला असता, तो त्या मशीनच्या बेल्टमध्ये अडकुन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आयुषचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेनं पूजा चौहान यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर बिस्कीट कंपनीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.