डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी, कुर्जे, वंकास, वरखंडा, तसेच तलासरी, अच्छाड आणि गुजरात राज्यातील भिल्लाड या परिसरात सोमवारी पहाटे भूकंपाचे सौम्य व मध्यम स्वरूपाचे धक्के जाणवले. पहिला धक्का ४.२७ वाजता, तर दुसरा ४.३५ वाजता जाणवला. भूकंपाची तीव्रता ३.७ रिश्टर स्केल होती, अशी माहिती गुजरात सिस्मोलॉजिस्ट विभागाने दिली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरात राज्यातील भिल्लाडजवळ असल्याचे समजते.
२०१८ पासून पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी भागात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. मागील पाच ते सहा वर्षांपासून या भागात लहान-मोठ्या धक्क्यांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सतत बसणाऱ्या धक्क्यांमुळे मोठ्या जीवितहानीची नोंद नसली तरी येथील घरांच्या भितींना तडे गेले आहेत. काही घरांची अवस्था इतकी खराब झाली आहे की, ती सध्या वापरण्यासाठी धोकादायक ठरली आहेत. मात्र या परिस्थितीतही आपत्ती व्यवस्थापन प्रशासन सुस्त असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.