पुणे: नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी शहर व लगतच्या भागात मद्याच्या नशेत वाहने चालवणाऱ्या ८५ तळीरामांविरुद्ध पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. त्याचबरोबर सिग्नल न पाळता बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या दोन ६३३ वाहनचालकांना सुमारे २० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.
नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी ३१ डिसेंबरला रात्री चौकाचौकात जल्लोष केला जातो. यंदा तर पहाटे पाचपर्यंत हॉटेल व बार खुले ठेवण्याची अनुमती शासनाने दिली होती. त्यामुळे, फर्ग्युसन रस्त्यासह शहराच्या मध्यवर्ती भागात सायंकाळपासून गर्दीला उधाण आले होते. सर्व हॉटेलस व बार ओसंडून वाहत होते. अर्थात, या वातावरणाचा काहीजणांकडून गैरफायदा घेतला जातो. त्यांना तसेच तळीरामांना चाप लावण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. शहराच्या २३ चौकांमध्ये वाहनचालकांची तपासणी केली जात होती. त्यामध्ये मद्याच्या नशेत चूर असलेले ८५ तळीराम पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत वाहतुकीला अडथळा केलेल्या ९०२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. हेल्मेट परिधान न केलेल्या २३, सिग्नल न पाळणाऱ्या ११८, एकेंरी मार्गातून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ६३२ आणि परवाना नसताना वाहने चालवणाऱ्या २३ जणांविरुद्ध दंडात्मक कोरवाई करण्यात आली. त्याचबरोबर, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे थांबलेल्या ४, सीटबेल्ट न लावलेल्या १०, गणवेश न घातलेल्या दोन रिक्षाचालकाविरुद्धही कारवाई करण्यात आली. तसेच, ट्रिपल सीट वाहने चालवणाऱ्या १७६, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या ४९, धोकादायक पद्धतीने वाहने चालवणाऱ्या ५६ आणि वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या ५५२ जणांविरुद्धही दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकंदर २६३३ वाहनचालकांना १९ लाख ८१ हजार ४५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.