पुणे : पाचशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा बाळगणार्या एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा पाच लाख रुपयांच्या ५०० रुपयांच्या २५० नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. निलेश हिराचंद वीरकर (वय-३३, रा. विष्णु गावडे चाळ, चिंचवड स्टेशनसमोर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत होते. सातारा रोडवरील पद्मावती बसस्टॉपसमोर ते आले असता पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना एक जण गडबडीने स्वारगेटच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले. आरोपीचा संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करुन काही अंतरावर जाऊन ताब्यात घेतले.
त्याने आपले नाव निलेश विरकर असे सांगितले. गडबडीत निघून जाण्याचे काय कारण आहे, असं विचारलं असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. सारखा पँटचे खिशात हात घालत होता. तेव्हा पोलिसांनी त्याचे खिसे तपासल्यावर त्यामध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल आढळून आले.
त्याबाबत विचारणा केली असता त्याने या नकली नोटा असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन नकली नोटा चलनात चालविण्यासाठी जवळ बाळगल्या होत्या, असं त्याने सांगितले. दरम्यान, आरोपीला पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली असून त्याच्याकडील २५० नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.