पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशप्रक्रियेसाठी शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरू असून, याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यभरातून २ हजार २७२ शाळांची आणि ३१ हजार ९५० रिक्त जागांची नोंदणी झालेली आहे. आरटीई प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू करावी, या मागणीसाठी आम आदमी पार्टी (आप) पालक युनियनच्या वतीने शिक्षण संचालक (प्राथमिक) यांना निवेदन देण्यात आले होते. २०२४-२५ मध्ये आरटीई प्रवेशप्रक्रिया प्रथम चुकीच्या निर्णयामुळे, त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया आणि पुनःप्रक्रियेमुळे लांबली गेली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले. आगामी काळात सीबीएससी माध्यमांच्या शाळेच्या शैक्षणिक वर्षाप्रमाणेच एसएससी बोर्डाचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
आरटीईअंतर्गत प्रवेश मिळणाऱ्या बऱ्याचशा इंग्रजी शाळा या सीबीएससी माध्यमाच्या असल्याने आरटीई प्रवेश होईपर्यंत खुल्या वर्गातील मुलांचे शिक्षण पुढे गेलेले असते. त्यामुळे आरटीई प्रवेश घेतलेल्या मुलांच्या मनात न्यूनगंड तयार होतो. जानेवारीमध्ये बऱ्याच शाळांचे खुले प्रवेश पूर्ण झालेले असतात. यंदा प्रवेशप्रक्रिया लवकर सुरू झाल्यास आरटीईमधून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना लॉटरी पद्धतीने प्रवेश न मिळाल्यास खुल्या गटातून प्रवेशाची संधी असेल, असे आपने नमूद केले आहे. शिक्षण हक्काचा उद्देश, तसेच त्यामधील जन्मदाखला, स्पेलिंगमधील किरकोळ चुका, पत्त्यामधील तांत्रिक चुका याबाबत पडताळणी समिती व शिक्षण अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, अशी मागणीही या निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली आहे.