-बापू मुळीक
सासवड : पुणे जिल्ह्यासह राज्यभरात सुरू झालेल्या 21 व्या पशुगणनेसाठी पुरंदर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागही सज्ज झाला. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाईल अॅपच्या माध्यमातून ही पशुगणना करण्यात येत आहे. पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्या पशुंची अचूक व योग्य ती माहिती देण्यात यावी, असे आवाहन पुरंदर तालुका पशुसंवर्धनाने केली आहे.
या पशुगणनेत गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, घोडे, गाढव आदी पशुधनाच्या 16 प्रजातींची जातीनिहाय, वयोगटासह लिंगनिहाय व उपभोगानुसार आकडेवारी गोळा केली जाणार आहे. संकलित होणाऱ्या माहितीवरून राज्यातील पशुंच्या संख्येसह पशुपालकांच्या अडीअडचणी व त्यानुसार कराव्या लागणाऱ्या उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. घरोघरी जाऊन पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना तालुक्यातील सर्व पशुपालकांनी योग्य व आवश्यक ती सर्व माहिती देऊन सहकार्य करावे, अशी माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अस्मिता सताळकर आणि पुरंदर अधिकारी डॉ. सताळकर यांनी दिली.
या उपक्रमाविषयी माहिती देताना डॉ. सताळकर म्हणाल्या, पुरंदर तालुक्यातही (दि. 28 फेब्रुवारी 2025) पर्यंत पशुगणना पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी 20 प्रगणकांची नेमणूक करण्यात आली. त्यांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडले आहे. तालुक्यात कार्यरत 4 पशुधन अधिकारी पर्यवेक्षक म्हणून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतील. या पशुगणनेमुळे येथील पशुधनाच्या लसीकरणासाठी, शासकीय योजना राबविणे, पशुपैदास गाई व म्हशीची संख्या, पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या ठरविणे, पशुधन कुक्कुटादी पक्षांचा वृद्धीदर ठरविणे, पशुधन क्षेत्रातील उदयोन्मुख्य ट्रेंड, आदी. सासवड येथे पशुगणना करताना अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. नमुने आणि आव्हाने ओळखण्यासाठी तसेच पायाभूत सुविधा व संसाधनांच्या वाटपासाठी मदत होणार असल्याचे डॉ. सताळकर यांनी सांगितले.