नाशिक : लोकसभा निवडणुकीत भाजपसह सत्ताधारी गटाच्या पक्षांकडून पैशाचे अमाप वाटप होत आहे. नेते, गुंड आणि मते विकत घेण्यासाठी त्यांनी आतापर्यंत दोन हजार कोटी खर्च केले आहेत. तर गत अडीच वर्षांत राज्य शासनाने तब्बल २५ हजार कोटींचे घोटाळे केले आहे. आमची सत्ता आल्यानंतर त्या सगळ्या पैशांची चौकशी करण्यात येणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केला आहे, आज नाशिकमध्ये रोहित पवार पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात महाविकास आघाडीचा जोर
राज्यात महाविकास आघाडीचा जोर असून महायुतीला केवळ १८ जागा मिळतील. त्यामध्ये भाजपला १३, शिंदे गटाला ३, तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचा दावा देखील रोहित पवार यांनी केला आहे. अनेक ठिकाणी ‘इव्हीएम’ बंद, मशीन चेकिंगसाठी लावलेले सीसीटीव्ही बंद असे प्रकार झाले आहेत.
राज्यात २५ हजार कोटींचे घोटाळे
नाशिकमध्ये ८०० कोटींचा, धाराशिवला ४५०० कोटींचा, कोल्हापुरात २०० कोटींचा असे राज्यभरात गत अडीत वर्षांत २५ हजार कोटींचे घोटाळे झाले आहेत, शेतकरी आणि मराठी माणूसच भाजपसह सत्ताधारी सर्व पक्षांना धडा शिकवणार आहे. सामान्यांचा नव्हे, तर केवळ पैसा, कमिशन आणि कंत्राट याचाच विचार राज्यकर्त्यांनी केला आहे असं रोहित पवार म्हणाले.