मुंबई : अग्निवीर प्रशिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची गंभीर घटना मुंबईतील मालाड परिसरात घडली. नौदलाच्या आयएनएस हमला येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. अपर्णा नायर (२०) असे मृत तरूणीचे नाव आहे. ती अग्निवीर प्रशिक्षण घेण्यासाठी मालवणी येथील आयएनएस हमला येथे आली होती. राहत्या खोलीमध्ये तीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. नौदलाच्या डॉक्टरांनी तिला तपासून मृत झाल्याचे घोषित केले. या बाबतची माहिती मालवणी पोलिसांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पोहचत या घटनेची तपासणी केली. त्यात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही.
या तरूणीने खोलीतील चादरीच्या साह्याने गळफास घेतला. प्राथमिक तपासणीत प्रेमप्रकरणातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची माहिती मृत तरूणीच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.