राज्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यात २ हजार ८५६ कोटी रुपये जमा
मुंबई : राज्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या बँक खात्यामध्ये सन 2024- 25 मध्ये 2 हजार 856.30 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती रोजगार हमी योजना विभागाकडून देण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत 100 दिवसांपर्यंतची मजुरी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून दिली जाते. तर 100 दिवसांच्या वरील मजुरी राज्या शासनाच्या निधीतून दिली जाते. त्यानुसार सन 2024-25 मध्ये 100 दिवसांपर्यंत मजुरीचे 2 हजार 616.30 कोटी निधी आणि 100 दिवसांवरील मजुरीचे 240 कोटी रुपये असा एकूण 2 हजार 856.30 कोटी निधी मजुरांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून सन 2024-25 मध्ये अनुक्रमे 66.21 कोटी व 5.88 कोटी रुपये असा एकूण 72.09 कोटी इतका निधी मजुरीपोटी पालघर जिल्ह्यातील मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आला असल्याची महितीही ‘रोहयो’ विभागाने दिली आहे.