लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून एक वर्षांसाठी अमरावती व नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. संकेत सुनील गायकवाड (वय-22) व सोमनाथ उर्फ डच्या बबन लोंढे (वय-20, दोघेही रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत गायकवाड व डच्या लोंढे यांच्यावर घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. वरील दोन्ही आरोपींवर लोणी काळभोर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नव्हती.
वरील दोन्ही गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून हडपसर परिमंडळ पाचच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या माध्यमातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील व पोलीस उपायुक्त आर राजा यांच्याकडे पाठविला होता.
दरम्यान, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्थानबद्धच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन अट्टल गुन्हेगार संकेत गायकवाड याला एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षांसाठी अमरावती कारागृहात तर डच्या लोंढे यांना एक वर्षांसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी वरील दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने पकडून कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार गणेश सातपुते, रामहरी वणवे, पोलीस नाईक तेज भोसले, चक्रधर शिरगीरे विलास शिंदे, सुरज कुंभार , शैलेश कुदळे, संभाजी देवीकर, योगेश पाटील व प्रदीप गाडे यांच्या पथकाने केली आहे.