वाघोली : येथील 17 वर्षीय मुलींवर दोघांनी मिळून लैगिंक अत्याचार (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मुलगी गर्भवती राहिली आहे. मुलीवर अत्याचार होवूनही तिच्या आईने अत्याचार करणा-यांची साथ दिल्याने आईसह तिघांवर पोक्सो (Poxo अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. अविनाश शेळके, गोविंद काकडे आणि तिची आई ( तिघेही रा. वाघोली ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही वाघोलीमध्ये एका कापड दुकानात काम करते. तिथे अविनाश शेळके याच्याशी तिची ओळख झाली. शेळके याने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी हिच्या सोबत दोन तीन वेळा जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्याबरोबरच स्वतःच्या मोबाईल मध्ये फिर्यादीचे उघडे फोटो काढले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून पुन्हा दोन वेळा जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. तर गोविंद काकडे हा फिर्यादीच्या आईचा मित्र आहे. त्याने ही एके दिवशी फिर्यादीची आई घरात नसताना जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक सबंध केले. तिने ही बाब आपल्या आईला सांगितली.
मात्र मुलीसोबत इतकं होऊनही आईने तिलाच धमकी देवून काकडे याचे नाव कुठेही घ्यायचे नाही. अशी उलट धमकी दिली. तसेच पोलीसात तक्रार करू दिली नाही. यानंतर तिला एका सामाजिक संस्थेत ठेवण्यात आले. तेथे तिला त्रास होवू लागल्याने तिची तपासणी केली असता ती गरोदर असल्याचे समोर आले.
या घटनेनंतर तिने स्वतः पोलीसात तक्रार दिली आहे. फिर्याद दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे यांनी गुन्हा दाखल करून तात्काळ तिघांना अटक केली. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.