पुणे : पुण्यातुन एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त लष्करी जवानाची तब्बल १७ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी सुरेश नाईक (वय-३९, रा. वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीवनी पाटणे (वय-२७, रा. रहेजा गार्डन, केदारी पेट्रोल पंपाजवळ, वानवडी) आणि शुभम मोड (रा. येवलेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजिवनी पाटणे या लष्करी जवानांची पत्नी असल्याचे सांगून नातेवाईकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांची फसवणूक केली आहे. तिने फिर्यादी यांना मी रेल्वे विभागात टी सी पदावर नोकरी करत असल्याचे सांगितले. रेल्वेत नोकरी असल्याबाबतचे टी सीचे आयकार्ड, बिल्ला तसेच इतर कागदपत्र पाठवून त्यांना विश्वासात घेतले. फिर्यादी यांची भाची आणि पुतणी यांना रेल्वेत नोकरी लावते, असे सांगून त्यांच्याकडून
वेळोवेळी पैसे घेतले.
दरम्यान, लष्करी जवानाची पत्नी आहे, असे सांगून तसेच तिचे पती यांना ब्रेन ट्युमर आजार असल्याचे खोटे सांगितले. त्यांच्याकडून औषधोपचाराकरीता वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे घेतले. रेल्वेतील नोकरीबाबत नियुक्तीचे बनावट पत्र असल्याचे समजल्यावर त्यांनी पैसे परत मागितले. त्यावेळी फिर्यादी यांना बँकेचे कर्ज मंजूर झाले की पैसे परत करते, असे सांगून टाळाटाळ केली.
फिर्यादी यांनी परत पैसे मागितल्यावर एकाने फिर्यादी यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. त्या पैसे परत करण्याची शक्यता नसल्याने शेवटी नाईक यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. या फिर्यादी नंतर आरोपीचे अगोदरचे अशाच प्रकारचे दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास वानवडी पोलिस करीत आहेत.