लोणी काळभोर : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असलेल्या 39 पोलीस ठाणे, वाहतूक शाखा व इतर शाखेतील सुमारे 962 बिनधनी व बेवारस वाहनांचा ई-लिलाव पध्दतीने लिलाव करण्यात आला होता. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील 164 बेवारस वाहने स्क्रॅपसाठी आज बुधवारी (ता.6) उचलण्यात आली आहेत. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस ठाण्यांना भेटी देऊन तपासण्या केल्या होत्या. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे बेवारस वाहने पडून आहेत. बेवारस वाहनांमुळे मोठी जागा व्यापली आहेत. तसेच काही पोलीस ठाण्याच्या बाहेर जागे अभावी रस्याचाही काही भाग व्यापला असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिक, तक्रारदारांची गैरसोय होत होती व पोलीस ठाण्यास अतिशय बकाल स्वरुप आले होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ”100 दिवसांचा कार्यक्रम” अंतर्गत सर्व शासकीय कार्यालये व परिसर यांची स्वच्छता व सुशोभीकरण करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. या कालावधीत सदर सर्व बिनधनी बेवारस वाहनांचा लिलाव करुन, सर्व पोलीस ठाणे व शाखा यांची स्वच्छता करावी. व नागरीक, तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात आल्यावर प्रसन्नता वाटेल व त्यांची गैरसोय होणार नाही. याबाबत वाहतुक शाखा यांनी सर्व पोलीस ठाणे, शाखा यांच्याशी समन्वय साधून लिलाव प्रक्रिया पार पाडावी. असे आदेश पारित केले होते.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील 962 बिनधनी व बेवारस वाहनांचा नाश करण्यासाठी ई-लिलाव करण्यात आला होता. हा लिलाव मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन (MSTC केंद्र शासन संलग्न संस्था) या कंपनीने घेतला आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 164 वाहने स्क्रॅपसाठी आज उचलण्यात आली आहेत.