प्रा. सागर घरत
करमाळा : करमाळा आणि इंदापूर या दोन तालुक्यांना जोडणारा दीडशे वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन डिकसळ पूल आज सोमवारपासून (ता.१०) अवजड वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आणि त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने मोठे लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.
सुमारे दीडशे वर्षांपूर्वी हा डिकसळ पुल असून पुलाचे दगडी बांधकाम काही ठिकाणी निखळू लागले होते. पाठीमागे स्थानिक ग्रामस्थांनी सिमेंट आणि विटांचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपात त्याची डागडुजी केली होती. मात्र हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा. अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी गेल्या काही दिवसापासून लावून धरली होती.
करमाळा तालुक्यातील नव्हे तर मराठवाड्यातील लोकांना पुणे व मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या पुलाचा वापर होत होता. तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश उसाची वाहतूक या पुलावरूनच बारामती अग्रो, अंबालिका, दौंड ऍग्रो, इंदापूर या साखर कारखान्यांना होत होती. पण आता हा पूल जड वाहतुकीस बंद केल्यामुळे वाहतूकदारांना ५० ते ६० किलोमीटरचा वळसा घालावा लागणार आहे.
दरम्यान, सध्या उजनी धरण तुडुंब भरले असून धरणा त ११७ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे कोकणातील सावित्री नदीच्या पुलावरील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काही अघटीत घटना घडू नये. म्हणून हा पूल प्रशासनाने जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.