माळेगाव: माळेगाव परिसरात ऊस शेतीला लागलेल्या आगीमुळे सुमारे १५ एकर क्षेत्रावरील ऊस, ठिंबक सिंचन संच, झाडे जळून सात शेतकऱ्यांचे सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीच्या या तांडवातून पोल्ट्रीला वाचवण्यात यश आल्याने सुमारे १४ हजार पक्षी वाचले आहेत.
माळेगाव येथील गट नं. ५७२ मधील ऊसाच्या शेतातून विजेच्या तारा गेल्या आहेत. दोन तारांमध्ये घर्षण झाल्याने ऊसाला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये सात शेतकऱ्यांचा एकूण १५ एकर ऊस जळाला. यासोबत ठिबक सिंचन संच जळाले. महादेव मारुती धायगुडे, शिवाजी अकोबा धायगुडे, आनंदीबाई शिवाजी धायगुडे (१० एकर), अर्जुन चंदर खवळे (१ एकर), जिलानी मगन शेख, लाला मगन शेख, फय्याज शब्बीर शेख (४ एकर) यांचा ऊस जळून खाक झाला आहे.
दरम्यान, आग विझवण्यासाठी नगर पंचायत माळेगाव फायर बुलेट, बारामती नगरपालिका, माळेगाव सहकारी साखर कारखाना, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या अग्निशमन दलाच्या वाहनाने आग आटोक्यात आणली.
…अन्यथा मोठा अनर्थ झाला असता
या आगीने रौद्ररूप धारण केले होते. युवा शेतकरी अस्लम शेख व रियाज शेख यांच्या पोल्ट्रीत सात हजार पक्षी, तर मयूर कुक्कुटपालन केंद्रात सात हजार असे १४ हजार पक्षी आगीपासून वाचवण्यात यश आले. जर या पोल्ट्रीस आग लागली असती, तर २५ लाखांहून अधिक नुकसान झाले असते. सुदैवाने आगीपासून पक्षी वाचवण्यात शेतकऱ्यांना यश मिळाले.