नवी दिल्ली : आयुष्मान भारत- पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे १४ लाख आयुष्मान वय वंदना कार्ड बनवण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शुक्रवारी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
ते म्हणाले की, ७० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबांची अंदाजे संख्या ४.५० कोटींपेक्षा जास्त आहे, म्हणजेच सुमारे सहा कोटी लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेअंतर्गत, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्रिस्तरीय तक्रार निवारण प्रणाली तयार करण्यात आली आहे.
जेणेकरून लाभार्थ्यांना संबंधित कोणत्याही बाबतीत कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये. २५ नोव्हेंबरपर्यंत, यासंबंधित ५,५६५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्यापैकी ९८ टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे, तर २०१८ मध्ये आयुष्मान भारत योजना सुरू झाल्यापासून ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुमारे ३५.८९ कोटी आयुष्मान कार्ड बनवण्यात आले आहेत.