बीड : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपासाला प्रचंड वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराड याचं मेडिकल करण्यात आलं. त्यानंतर त्याला तातडीने बीडच्या केज कोर्टात काल(दि. 31)रात्री उशिरा हजर करण्यात आलं. यावेळी आरोपीच्या रिमांडबाबत सुनावणी करण्यात आली. सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला. तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले आहेत. मग जामीन मिळायला हवा, असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रात्री 10 वाजेनंतर केजच्या कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ऐकण्यासाठी कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधकांची तुफान गर्दी जमली होती. या पार्श्वभूमीवर कोर्ट परिसरात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला. त्यानंतर कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. सीआयडीने 15 दिवसाची कोठडी मागितली होती. पण कोर्टाने 14 दिवसाची कोठडी दिली आहे. सीआयडीचं हे मोठं यश असल्याचं सांगितलं जात आहे.
सरकारी वकील युक्तिवाद..
हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार आहे. त्यामुळे कराडची कोठडी महत्त्वाची आहे. कराडच्या कोठडीशिवाय घुलेचा शोध घेणं कठीण आहे. हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे का हे तपासायचे आहे. मोबाईलवरचं संभाषण हे कराडचंच आहे का? हे तपासायचं आहे. तपासासाठी कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी द्या! संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडचा हात आहे का? हे सुद्धा तपासायचं आहे. सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा. वाल्मिक कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे. काम बंद करू, हातपाय तोडू अशी धमकी सुदर्शन घुलेने दिली होती.
कराडचे वकील अशोक कवडे यांचा युक्तिवाद..
फक्त खंडणी प्रकरणाचा आरोप आहे. कराडा हा गरीब सामाजिक कार्यकर्ता असून कराडांना या प्रकरणात जाणूबुजून अडकवलं जात आहे. राजकीय द्वेषापोटी अडकवण्याचा प्रयत्न आहे. 2 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे, त्यातील किती पैसे दिले हे सांगा. 2 कोटींची खंडणी मागितली हा फक्त आरोप आहे. आवाजाचे नमूने द्यायला तयार आहोत, पण कोठडी नको. कराड सरेंडर झाले आहेत, तर आता जामीन द्यावी. मीडिया ट्रायल पाहून कोर्टाने निर्णय घेऊ नये. कराडला न्यायालयीन कोठडी द्यावी. सर्व पेपर तुमच्याकडे आहे, तुम्ही तपास करा. 308 हे कलम चुकीच्या पद्धतीने लावलं जात आहे.
केज कोर्ट परिसरात पोलिसांचा लाठीचार्ज
वाल्मिक कराड हा केज कोर्ट परिसरात सुनावणीसाठी दाखल झाल्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी पोलिसांकडून घेण्यात आली. त्यामुळे वाल्मिक कराड कोर्ट परिसरात दाखल होण्याआधी पोलिसांनी केज कोर्ट परिसरात जमलेल्या गर्दीला हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. सर्व गर्दी दूर बाजूला सारण्यात आली. त्यानंतर थोड्या वेळाने वाल्मिक कराडला तिथे आणण्यात आलं.