पोखरापूर : चरीच्या खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी होवून पाण्यात गुदमरून १३ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज ५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील घाटणे गावच्या शिवारात घडली आहे. स्वराज मनोज देशमुख असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे मनोज हणमंत देशमुख हे त्याच्या कुटुंब समवेत राहून शेती करतात. त्यांचा मुलगा स्वराज हा ७ वी मध्ये शिकत आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मनोज देशमुख यांनी त्यांच्या घराचे समोर त्यांचा ट्रॅक्टर क्र.एम.एच.१३/डी.टी.०२४३ हा उभा करून जेवण करत होते. त्यावेळी मुलगा स्वराज याने सदर ट्रॅक्टर चालू करून शेताकडे जात होता. गावाच्या जवळ असलेल्या पाणी पुरवठा विहीरीच्या शेजारी रोडलगत असलेल्या चारीत ट्रॅक्टर वेगात असल्याने खडयात पलटी झाला.
या घटनेत स्वराज देशमुख हा ट्रॅक्टरसह पाण्यात पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला बाहेर काढून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच स्वराज्यचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघाताप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून याबाबतची फिर्याद विश्वास जालींदर गायकवाड यांनी दिली आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस ठाण्याचा अपघात विभाग करत आहे.