पुणे : पेरणे फाटा येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत करण्याकरिता ३१ डिसेंबर रोजी पर्यटकांची होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी विविध अधिकार दिले आहेत.
पोलिसांना मिळालेल्या अधिकारांमध्ये, सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे, ढोल, ताशा व इतर वाद्य, शिंगे व इतर वाद्ये वाजविण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना त्रास होऊ नये, म्हणून ध्वनिक्षेपकाचा (लाऊड स्पीकर) उपयोग करण्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिले आहेत.
याबरोबरच मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांना वर्तणूक कशी ठेवावी, याविषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुकीचा मार्ग आणि वेळ ठरविणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी तसेच उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याची शक्यता असेल, तर अशा सर्व प्रसंगी अडथळा टाळण्यासाठी आदेश देणे, असे अधिकार पोलीस अधिकार्यांना दिले आहेत.
दरम्यान, हे अधिकार २५ डिसेंबर २०२२ ते ७ जानेवारी २०२३ रोजीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत पोलिसांकडे असतील. सदर अधिकार हे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३६ च्या अधिकारान्वये पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलीस अधिकार्यांना प्रदान केले आहेत.