सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून आपापल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यानंतर आता दोन्ही उमेदवारांकडून ही जागा जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
सोलापूर शहर जिल्हा भाजप ओबीसी आघाडीची बैठक शांतीसागर मंगल कार्यालयात शनिवारी (दि.१३) पार पडली. यामध्ये भाजप उमेदवार राम सातपुते यांची देखील उपस्थिती होती. यावेळी ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षांत झालेल्या विकासकामांच्या भांडवलावर सोलापूर लोकसभा निवडणुकीत आपण तीन लाखांचे मताधिक्य घेऊन निवडून येऊ. सोलापूर भाजपचा मजबूत बालेकिल्ला असून, शिवाय पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा कायम आहे. मतदारांमध्ये मोदींविषयी विश्वासाची भावना आहे. याच बळावर आपला विजय निश्चित असल्याचे आमदार सातपुते यांनी सांगितले.
कोल्हापुरातील खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे भीमा सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे. भीमा परिवाराच्या माध्यमातून महाडिक गट मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांच्या विरोधात कार्यरत आहे. परंतु, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हे परस्परांचे शत्रू महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. मोहोळ तालुक्यात अस्तित्वात असलेल्या भीमा परिवाराच्या बैठकीत आमदार राम सातपुते यांना समर्थन जाहीर करण्यात आले.
2014 पासून भाजपचाच खासदार
2014 पासून हा मतदारसंघ भाजपकडेच आहे. 2019 मध्ये भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे निवडून आले आहेत. तेव्हा त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचाच पराभव केला होता.
प्रणिती शिंदे-राम सातपुतेंमध्ये लढत
सध्या महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसने उमेदवारीची घोषणा केली. तर महायुतीकडून भाजपच्या राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात शिंदे विरूद्ध सातपुतेंमध्ये खऱ्या अर्थाने लढत होणार आहे.
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचा पराभव
सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना 1952 मध्ये झाली. तेव्हापासून अनेक वर्षे या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व होते. मात्र, 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली. त्यानंतर हा राखीव मतदारसंघ म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हा सुशीलकुमार शिंदे निवडून आले होते. मात्र, 2014 च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला आणि त्याठिकाणी भाजपच्या शरद बनसोडे या नवख्या उमेदवाराचा विजय झाला होता.