सांगली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता जवळपास सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा केली. त्यात सांगलीतून विशाल पाटील हे आग्रही असताना त्यांच्याऐवजी ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज असलेल्या विशाल पाटील यांनी बंड केले. त्यावर बोलताना त्यांनी ‘सांगलीच्या रक्तातच बंड आहे, ते यशस्वी करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे’, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सांगलीत जोरदार शक्तिप्रदर्शन करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शेकडो कार्यकर्त्यांसह पाटील यांनी मंगळवारी गणेश मंदिरात दर्शनानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढली. काँग्रेस समितीसमोर पदयात्रा आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही माजी नगरसेवकही उपस्थित होते.
विशाल पाटील म्हणाले, ‘शिवसेना नेत्यांनी मशाल घेऊन निवडणूक लढण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आपण काँग्रेसच्या विचारधारेवर ठाम आहोत. आपण डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून, हे कोणाला बघवलं नसावे. अजूनही आपणाला काँग्रेसची उमेदवारी मिळेल, असा विश्वास वाटतो. तरीही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली असून, कोणत्याही स्थितीत आता माघार घेणार नाही’, अशी भूमिका त्यांनी मांडली.
तसेच आमची काँग्रेसच्या विचारधारावर आजही श्रद्धा आहे. माझा लढा भाजपशी आहे. काँग्रेस आणि काही घराणी संपवावी यासाठी काही जण प्रयत्नशील आहेत. यामागे कोण आहे का? याचा समाचार निवडणुकीनंतर निश्चित घेतला जाईल. जिल्ह्यातील 38 हजार मतदारांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेला कौल मान्य करत लढ्यात उतरण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसमधील बंड नसून काँग्रेसचेच बंड
कोरोना काळ आणि महापूराच्या काळात आम्ही कार्यकर्त्यांसोबत लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर होतो. मात्र, भाजपचे खासदार कुणाचा भूखंड स्वस्तात मिळतो का? याची चाचपणी करत होते, असा आरोप त्यांनी केला. तसेच माझी उमेदवारी म्हणजे काँग्रेसमधील बंड नसून काँग्रेसचेच बंड आहे. आम्हालाही शेतकरी पुत्राने आमदार, खासदार व्हावे वाटते. मात्र, शेतकरी पुत्राचा राजकीय बळी जाऊ नये, अशी आमची प्रामाणिक इच्छा असल्याचा टोलाही शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना लगावला.