पुणे : यंदा गणरायाचे आगमन महिनाअखेर म्हणजे ३१ ऑगस्ट रोजी होत आहे. महिनाअखेऱ असल्याने अनेक जणांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या अनेकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यंदाचा गणेशोत्सव आणखी आनंददायी ठरणार आहे.
अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना गणेशोत्सव साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी चालू (ऑगस्ट) महिन्याचे वेतन गणेशोत्सव सणापूर्वी देण्यात यावे, अशा सूचना वित्त विभागाने शासनाच्या सर्व विभागांना दिल्या आहेत.
या निर्णयामुळे जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, शासनाच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा तसेच निवृत्तीवेतनधारकांना सणाच्या पूर्वी पगार मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या तयारीला त्यामुळे आर्थिक हातभार लागणार आहे.
गणेशोत्सव चालू महिन्यांच्या शेवटच्या दिवशीच येत आहे. त्यामुळे उत्सव साजरा करणे सोईचे व्हावे, यासाठी सणाच्या आधी सर्व शासकीय कर्मचारी, अधिकारी यांचे वेतन २९ ऑगस्टपूर्वी करावे, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. याबाबतचे आदेश वित्त विभागाचे उपसचिव इंद्रजित मोरे यांनी काढले आहेत.