पुणे : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघातात पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास निधन झालं आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला. आज मराठा समन्वय समितीची बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे.
या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. विनायक मेटे म्हणजे आंदोलनांचा बुलंद आवाज. सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारत सळो की पळो करून सोडणारे विनायक मेटे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरत आंदोलन करणारे विनायक मेटे… मराठा समाजाच्या आंदोनांचा चेहरा. अश्या या नेत्याच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला…
मराठा समन्वय समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती.या बैठकीसाठी पुण्याहून ते मुंबईला येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात जखमी झाल्यानंतर विनायक मेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही. जवळपास एक तासाहून अधिककाळ त्यांना मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागली. उपचारांना उशीर झाल्याने त्यांना जीवाला मुकावं लागल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केलाय.