लहू चव्हाण
पाचगणी : विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय भिलार ग्रामपंचायतीचा घेतला आहे. अनिष्ट विधवा प्रथा बंद करणे बाबतचा ऐतिहासिक निर्णय घेण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला आहे. अश्याप्रकारे एकमुखी ठराव करणारी भिलार ग्रामपंचायत ही महाबळेश्वर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
ग्रामपंचायत हेरवाड (ता. शिरोळ जि. कोल्हापूर) यांनी दि. ५ मे २०२२ रोजी मंजूर केलेल्या ग्रामसभा ठरावान्वये, समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव सर्वप्रथम सर्वानुमते मंजूर केल्यानंतर राज्यशासनाने १७ मे २०२२ रोजी शासन परिपत्रक काढून ग्रामपंचायतीनी अश्याप्रकारे निर्णय घ्यावेत असे अवाहन केले होते.
विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून आपण वाटचाल करत असलो तरीही, पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यांसारख्या प्रथांचे समाजात पालन केले जात आहे. पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला विधवा म्हणून समाजात वावरत असताना अवहेलनेस सामोरे जावे लागते.
या महिलांना त्यानंतर समाजात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवू दिले जात नाही. या कुप्रथांचे
पालन होत असल्याने अशा व्यक्तींच्या प्रतिष्ठेने जीवन जगण्याच्या मानवी अधिकाराचे तसेच भारतीय संविधानाने बहाल केलेल्या समतेच्या हक्काचेही उल्लंघन होते. त्यामुळे अशा प्रथेचे निर्मुलन होणे ही काळाची गरज आहे. यालाच प्रतिसाद देत भिलार येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत हा ठराव मंजूर केला.
भिलार ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शिवाजी भिलारे आणि ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण यांनी ही ग्रामसभा आयोजित केली होती. ग्रामसभेत सुरुवातीला किसन भिलारे यांनी हा विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय मांडला. याला शंकरराव भिलारे यांनी अनुमोदन दिल्यानंतर सर्वांनी एकमुखाने हा ठराव पास केला. ग्रामसेवक राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक करून ग्रामसभेचे महत्व विशद केले.
यावेळी सरपंच शिवाजी भिलारे, युवानेते नितीनदादा भिलारे, अनिल भिलारे, प्रवीण भिलारे, राजेंद्र भिलारे ,किसन भिलारे, उपसरपंच सुनीता भिलारे,माजी सरपंच वंदना भिलारे, वैभव भिलारे, संदीप पवार, मंगल भिलारे, वैशाली कांबळे, सारिका पवार आदी सदस्यांसह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
.