अजित जगताप
सातारा : शेतकरी टिकला व जगला पाहिजे ही प्रत्येकांची भावना असते. आपल्या कृषी प्रदान देशात शेती पिकांसाठी सहकारी चळवळ उभी राहिली. पण,दुर्दैवाने सत्ताधारी व विरोधक राजकर्त्यांच्या प्रेमापोटी ती व्यापाऱ्यांकडे गेली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकांचे वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यात नुकसान होत आहे. याकडे दुर्लक्ष होत असून आता शेतकऱ्यांनीच ‘शेतकऱ्यांचा आसूड’ बाहेर काढला पाहिजे.
वडूज-पुसेगाव रस्त्यावरील वडूज कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. याठिकाणी साठ व्यापारी गाळे बांधण्यात आले आहे. त्याला स्लॅब आहे पण, जिना नाही.त्यामुळे खालच्या गाळ्यात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले पीक, कडधान्ये, धान्य आहे व वरून छतावरील पाण्याचा अतिवृष्टीमुळे अभिषेक होत आहे.
त्यामुळे ज्वारी,बाजरी, गहू, घेवडा, सोयाबीन, डाळी व इतर नगदी पिके येथे उघड्यावर ठेवण्याशिवाय पर्याय नाही. काही गाळे बंद असून वापरा विना पडून आहेत. तर काहींनी रस्त्यालगतच्या गाळ्यात शेती पूरक उधोग सुरू केल्याने किमान याठिकाणी तरुणाई ची वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी समितीच्या आवारात व्यापारी गाळे बांधताना जिना का नाही बांधला? हा प्रश्न आताच्या घडीला विचारणे म्हणजे उन्हं पडल्यानंतर पंचनामा का केला? असे म्हणायचा प्रकार आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष न देता गाळ्या वरील छताची स्वच्छता करून किमान धान्याची नासाडी होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
सध्या सणासुदीला खटाव तालुक्यातील गरीब शेतकरी वर्ग घेवडा, मूग ,उडीद आणि इतर सर्व कडधान्य विक्रीसाठी घेऊन येत आहेत. धान्याची आवक वाढल्यानंतर दरातही चढउतार पाहण्यास मिळत आहे.धान्याची गुणवत्ता न पाहता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरलेली पैशाची चणचण पाहून दर ठरविले जातात. असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते करीत आहेत.त्यामध्ये तथ्य आहे. पण, मांजराच्या गळ्यात घंटा अडकविण्यासाठी प्रशासकांना सवड नाही.असे दिसून येत आहे.
दिल्ली बाजार पेठेत दर नसल्याने वडूज बाजार समितीत वाघ्या घेवड्याची खरेदीसौदे बंद आहेत. दिल्ली मार्केटमध्ये वाघ्या केवढ्याला बाजार भाव नसल्याचे कारण देत काही व्यापाऱ्यांनी वाघ्या घेवडा खरेदी बंद केली आहे.त्याबाबत बाजार समितीचा प्रशासन मूग गिळून गप्प आहे. संचालक मंडळ बरखास्त झाल्यामुळे आता कृषी उत्पन्न बाजार समितीवर सचिव आणि सहाय्यक निबंधक लेखी कारभार पाहत आहेत.त्यांना याठिकाणी येण्यास सवड मिळत नाही. त्यामुळे वडूज बाजार समितीला वाली राहिलेला नाही.
शनिवारी बाजार असल्याने शेतकरी वर्गाची धांदल उडते. थेट रस्त्यावरच काही व्यापारी-दलाल हे शेळ्या-मेंढ्या खरेदी करण्यासाठी धावत असतात. एखाद्या दिवशी मोठा अपघात घडल्यानंतर सर्वाना जाग येणार का? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच सर्व गाळेधारकांची पुन्हा एकदा तपासणी करून त्यांच्या ही अडीअडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी खटाव तालुक्यातील सामान्य शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते दत्ता केंगारे, अजित कंठे व शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली आहे.
दरम्यान, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना योग्य दर दयावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे अनेकांना मनापासून वाटत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला शेतकरी व सामान्य शिवसैनिक म्हणून जाहीर पाठींबा राहील असे खटाव तालुक्यातील श्री युवराज पाटील व बाळासाहेब जाधव,विकास काळे व शेतकऱ्यांनी सांगितले.